केशव कदम । बीडदि.22 ः कुठलेही काम लाच घेतल्याशिवाय करायचेच नाही, असा चंग अधिकारी, कर्मचार्यांनी बांधला असल्याचे दिसत आहे. सध्या आचारसंहिताचे कारण देऊन कुठलेही काम करण्यासाठी मोठमोठ्या लाचेची मागणी केली जात आहे. सकाळी पिंपळनेर ठाण्यातील पोलीस कर्मचार्यासाठी लाच स्विकारताना होमगार्ड पकडला, तर सायंकाळी बीड नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंतासह खाजगी इसमाला नऊ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. एकाच दिवशी चार लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने लाचखोरी किती वाढली आहे, हे समोर आले आहे. (Beed acb trap news)
पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत वाळूचा ट्रॅक्टर चालू देण्यासाठी पोलीस कर्मचार्याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाच स्विकारताना होमगार्डला जालना एसीबीने बुधवारी (दि.23) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात रामप्रसाद शिवनाथ कडूळे पोलीस अंमलदार पिंपळनेर व होमगार्ड ईश्वर बाबासाहेब जामकर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी बीड नगर पालिकेत बीड एसीबीने कारवाई केली. फारुकी अखिल आहेमद वकील आहेमद (वय 55, कनिष्ठ अभियंता, नगर परिषद) व खाजगी इसम किशोर कोंडीराम खुरमुरे (वय 35 रा. स्वराज्य नगर, बीड) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदाराचे वडील व त्यांचे शेजारी यांचे बांधकाम परवाना काढण्यासाठी नगररचना विभाग, नगर परिषद, बीड येथील परवानगी कार्यारंभ देण्यासाठी फारुकी आखिल यांचे खाजगी मदतनीस किशोर खूरमुरे यांनी 12 लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती नऊ लाख रुपये लाच रक्कम स्वतःसाठी मिळावी म्हणून ही लाच किशोर खुरमुरे यांचेकडे देण्यास सांगून प्रोत्साहन दिले म्हणून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. कार्यारंभ या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे व त्यांच्या टिमने केली. या कारवायामुळे बीड जिल्ह्यात लाचखोरी किती वाढली आहे, शिपायांपासून ते वरिष्ठांपर्यंत व्यवस्था किती लाचखोरीसाठी बरबटलेली आहे, असा चर्चा होत आहे.