बीड दि.29 : मागील आठवड्यात एकाच दिवशी बीड एसीबीने चार लाचखोर पकडले होते. त्यानंतर आज मंगळवार, 29 ऑक्टोंबर रोजी धनत्रयोदशीला बीडमध्ये एसीबीने फटाका फोडला आहे. दोन हजाराची लाच घेताना एका तलाठ्यास रंगेहाथ पकडले आहे. (Beed acb trap news)
बीड एसीबीच्या टीमकडून लाचखोर तलाठ्याच्या घराची झडती घेण्यात आली.
बीड तालुक्यातील तळेगाव येथील तलाठी मदन लिंबाजी वनवे (वय 35 , रा. गायकवाड यांचे घर, पंढरी, धानोरा रोड बीड) यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील आठवड्यामध्ये एकाच दिवशी चार लाचखोर पकडल्यानंतर बीडीसीबीने पुन्हा एका लाचखोराला पकडले आहे. (Beed acb trap)
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना त्यांचे मित्राने मौजे तळेगाव येथील शेत गट क्रमांक 192 मधील मालमत्ता क्रमांक 4309 चे मुख्त्यार पत्र करून दिले होते .सदर प्लॉटची ग्रामीण गुंठेवारी करण्यासाठी भोगवटादार प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने लोकसेवक श्री वनवे यांचे कडे तक्रारदार गेले असता लोकसेवक वनवे यांनी भोगवटादार प्रमाणपत्र देण्यासाठी पंचा समक्ष तीन हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती दोन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून सापळा कारवाईदरम्यान दोन हजार रुपये आरोपी लोकसेवक वनवे यांचे खाजगी कार्यालयात घेताना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेख युनूस, किरण बगाटे, पोलीस अंमलदार, भरत गारदे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे यांनी केली.