बीड दि.30 : मनोज जरांगे पाटील यांनी सक्षम उमेदवार मैदानात उतरविला तर मी जरांगे पाटलांच्या उमदेवारांचे काम करणार आहे. परंतु क्षीरसागरांचा पराभव करेल, असा उमेदवार त्यांच्याकडून नाही आला तर माझा बी प्लॅन तयार असावा म्हणून मी महापरिवर्तन विकास आघाडीकडून म्हणजेच तिसर्या आघाडीकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती कुंडलीक खांडे KUNDLIK KHANDE यांनी दिली. ते आज बीड येथे आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.कुंडलीक खांडे म्हणाले, माझ्या राजकीय जीवनाची सुरूवात ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समितीपर्यंत राहीलेली आहे. दोन्ही शिवसेनेचा मी जिल्हाप्रमुख म्हणून देखील काम केले आहे. 2019 ची निवडणूक लढावी म्हणून मला जिल्हाप्रमुख करण्यात आले होते. परंतु त्यावेळी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऐनवेळी पक्षात प्रवेश केला आणि ऐनवेळी माझी तयारी असतानाही मला माघार घ्यावी लागली. मधल्या काळात उध्दव ठाकरेसाहेबांना एकाचे दोन सांगून पक्षातीलच विरोधकांनी माझ्या विरोधात कट कारस्थान केले. माझ्यावर गुन्हे नोंद करण्याचे काम केले. माझ्यावर जो गुन्हा नोंद केला त्यात मी हायकोर्टात जावून तो गुन्हा रद्द करून घेतला. नंतर उध्दव साहेब यांना भेटून मी स्थानिक पदाधिकारी कशाप्रकारे त्रास देतात हे सांगून मी एकनाथ शिंदे साहेबांकडे जाण्याचा निर्णय घेतला. 2020 ते 2024 या काळात मला हरवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण कुठेच त्यांना यश येत नव्हते. परंतु लोकसभेच्या काळात काय परिस्थिती होती हे सगळ्यांना माहिती आहे. अशावेळी काहीतरी क्लिप व्हायरल करून माझी बदनामी केली. आता मनोज जरांगे पाटील यांना भेटून मी इच्छूकांपैकी कोणालाही उमदेवारी द्या परंतु सक्षम उमेदवार द्या अशी मागणी केली आहे. तिकडून क्षीरसागर यांचा पराभव करतील असा सक्षम उमेदवार न आल्यास माझा ‘बी प्लॅन’ तयार असावा म्हणून मी छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू यांच्या महापरिवर्तन विकास आघाडीकडून फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला आहे, असे कुंडलीक खांडे म्हणाले.
माझी 376 बूथवर तयारी2019 च्या निवडणुकीतच विधानसभा लढण्याची तयारी केली होती. परंतु काही वेगळी समीकरणे तयार झाल्याने त्यावेळी निवडणूक लढता आलेली नाही. आताही माझी सगळी तयारी झालेली आहे. 376 बुथचे प्लॅनिंग झालेले आहे. सगळे कार्यकर्ते रेडी आहेत. फक्त पाटलांचा आदेश यावा. तीनही क्षीरसागरांचा पराभव करेल. रिंगणात इतर कितीही उमेदवार असू द्या, माझी लढून जिंकण्याची पूर्ण तयारी झालेली आहे, असेही कुंडलीक खांडे म्हणाले.
मला अडकविण्यात पंकजाताईंचा काही हात नाहीबीडच्या इतिहासात कोणी कोणाही विरोधात आजपर्यंत निवडणुका लढवल्या आहेत. मात्र त्यांना जेलमध्ये टाकण्याचे कारस्थान कोणीही केलेले नाही. परंतु कुंडलीक खांडे यांना निवडणूक लढवता येऊ नये यासाठी मला दोन महिने जेलमध्ये टाकण्याचे काम शिंदे साहेबांच्या शिवसेनेतील पदाधिकार्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे कान भरण्याचे काम केले. मला अडकविण्यात पंकजाताईंचा कसलाही हात नाही, असेही कुंडलीक खांडे म्हणाले.
क्षीरसागर यांच्याशिवाय दुसरा कोेणीही उमेदवार हवामहाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून क्षीरसागर घरातील उमेदवार प्रमुख पक्षाने दिले आहेत. शिंदे गटाकडून अनिलदादा जगताप उमेदवार येतील असे वाटले. महाविकास आघाडीकडून ज्योतीताई मेटे उमेदवार येतील असे वाटत होते. पण असे काहीही झाले नाही. म्हणून मनोज जरांगे पाटलांना भेटून सांगितले की आता क्षीरसागरांचा पराभव करण्यासाठी सक्षम उमेदवार द्या. त्यांनी सांगितले की मराठा-मुस्लीम- दलीत मतांचे समीकरणे जुळले तर आपण नक्कीच उमेदवार उतरवणार आहोत. पण गणित नाही जुळले तर मात्र आपल्याला माघार घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. त्यांची भुमिका स्पष्ट आहे. त्यामुळे ऐनवेळी त्यांनी उमेदवार नाहीच दिला तर मात्र माझा बी प्लॅन तयार असावा. कारण एकदा वेळ निघून गेली तर मला पुन्हा एबी फॉर्म जोडता येणार नाही. फॉर्म काढता येईल, पक्षाचा फॉर्म जोडता येणार नाही, असे म्हणून मी महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचा एबी फॉर्म जोडलेला असल्याचे खांडे म्हणाले.
200 ते 250 कोटीची विकासकामे केलीकुंडलीक खांडे म्हणाले, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मी बीड मतदारसंघात 200 ते 250 कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखीन निवडणूक लढवा म्हणून आग्रह केलेला आहे. मनोज जरांगे पाटलांना देखील हे सांगितले आहे. स्थानिक राजकारणात आम्हाला क्षीरसागर नकोच आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी निवडणूक लढवावी लागेल, त्यासाठी तिसर्या आघाडीचा पर्याय मी स्विकारला. मनोज जरांगे पाटलांनी दिलेला उमेदवार क्षीरसागरांना पर्याय ठरला तर मी माझा फॉर्म माघारी घेईल, असेही खांडे म्हणाले.