सोळंकेंच्या विजयासाठी महायुती, पुरूषोत्तमपुरी सर्कल सरसावले
माजलगाव दि.5 : महायुतीचे उमेदवार आ. प्रकाश सोळंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी देशातील एकमेव असलेल्या भगवान पुरूषोत्तमाच्या चरणी नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी पुरूषोत्तमपुरी परिसरातील पंधरा ते वीस गावातील ग्रामस्थांनी आ. सोळंके यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या सादोळा, किट्टीआडगाव पंचायत समिती गण मेळाव्यात बोलतांना आ. सोळंके म्हणाले, भगवान पुरूषोत्तमाचे देशामध्ये एकमेव असे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी व विकासाकामांसाठी 55 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच या भागातील शेतकर्यांसाठी वरदान ठरलेल्या लोणी सावंगी उच्चपातळी बंधारा, तसेच नुकताच शुभारंभ झालेला सुर्डी-सादोळा या रस्त्यासह या भागातील प्रत्येक गावातील प्रमुख रस्ते विवीध योजने अंतर्गत पाणंद रस्ते आदी विकासाची कामे पुर्णत्वास नेण्यासाठी कायम प्रयत्न केले आहेत. यावेळी शिवाजीराव रांजवण पाटील, माजी सभापती जयसिंग सोळंके, अच्युतराव लाटे, शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, भाजपा तालुकाध्यक्ष अरूण राउत, रविकांत राठोड, उपजिल्हाप्रमुख नितीन मुंदडा, बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, संभाजी शेजुळ, आझाद क्रांती सेनाप्रमुख राजेश घोडे, अमोल शेरकर, सरपंच अजय शिंदे, भागवत शेजुळ, शहाजी कोलते, छबन जाधव यांची उपस्थिती होती.
आ. सोळंकेंना अश्रू अनावर…
आज कै. लोकनेते सुंदरराव सोळंके यांची पुण्यतिथी असून माजलगाव मतदार संघाच्या विकासासाठी व माझ्या जडणघडणीसाठी साहेबांचा मोठा वाटा होता. आज त्यांच्या विचारांची प्रेरणा घेवूनच यशस्वी मार्गक्रमण करत आहे. आज त्यांची पुण्यतिथी असून त्यांच्या आशिर्वादाच्या जोरावर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. माझ्या घरावर मागील वर्षी दुर्देवी हल्ला झाला. मी घरात असतांना माझ्या घराला आग लावली. यामध्ये मोठे नुकसान तर झालेच परंतु मतदारसंघातील जनतेच्या आशिर्वादामुळे वाचलो आणि या दुर्दैवी घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नाही. परंतु विरोधक माझेच घर जळाले असतांना माझी बदनामी करण्याचे षडयंत्र करत असल्याचे आ. सोळंके यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.