बीड

पाच मतदारसंघात लोकसभेसारखी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली जाणार

By Balaji Margude

November 23, 2024

आठ वाजता मतमोजणीला होणार सुरूवात

सुरूवातीला मोजले जाणार टपाली मतदान

प्रतिनिधी । बीडदि.22 : बीड जिल्ह्यातील मतदारांचा नेमका मूड काय हे कोणालाच कळायला मार्ग नाही. परंतु शनिवारी (दि.23) आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर 11 वाजेपर्यंत जिल्ह्याचा मूड कुणीकडे जातोय हे कळण्यास थोडीफार मदत होईल. तर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातील आमदार कोण हे अधिकृतपणे दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. लोकसभेच्या मतमोजणीवेळी ज्याप्रमाणे शेवटच्या फेरीपर्यंत कोण निवडून येणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती अगदी तशीच उत्सुकता माजलगाव, केज, आष्टी, बीड आणि गेवराई मतदारसंघात राहणार आहे.जिल्ह्यातील सहा मतदार संघात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि.23) संबंधीत विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी होईल. टपाली मतपत्रिकांच्या मतमोजणीने प्रक्रीयेला सुरुवात होईल. प्रत्येक मतदार संघात 14 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात मतमोजणीच्या सर्वात कमी फेर्‍या परळीत तर सर्वाधिक फेर्‍या आष्टी मतदार संघात होणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी शुक्रवारी (दि.22) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (निवडणुक) महेंद्रकुमार कांबळे, डॉ.श्याम टरके, श्रीमती आचार्य, पोलिस निरीक्षक कस्तुरे आदी उपस्थित हेाते.बीडची मतमोजणीची प्रक्रीया शहरानजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामस्थळी होणार आहे. यासाठी येथे मंडपाची उभारणी करुन लोकांची गर्दी होऊ नये साठी बॅरीकेट्स लावले आहेत. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. अशीच तयारी प्रत्येक मतदार संघाच्या मतमोजणीस्थळी करण्यात आल्याची माहिती अविनाश पाठक यांनी दिली. दरम्यान, सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाल्यानंतर प्रत्येक फेरीच्या मतमोजणीनंतर विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी संबंधीत विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक निरीक्षकांकडून मान्यता घेऊन प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर करतील. 300 पोस्टल मतांसाठी एक टेबल आणि त्याच वेळी उर्वरित 13 टेबलांवर 13 ईव्हीएम मशिन मांडून त्या मशिनमधील मतांची मोजणी होईल. पोस्टल मतांची मोजणी संपल्यानंतर लागलीच त्याच टेबलावर ईव्हीएम मशीनमधील मतांचीही मोजणी होईल. सर्व फेर्‍या संपण्यासाठी अधिकतर तीन वाजू शकतात, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

या ठिकाणी होणार मतमोजणी