बीड

मस्साजोग खून प्रकरण ; जरांगे पाटील मयत देशमुख कुटुंबियांच्या भेटीला!

By Keshav Kadam

December 10, 2024

बीड दि.10 : केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग येथे रास्तारोको केला असून अद्याप मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. आता मनोज जरांगे पाटील हे मयत देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मस्साजोगला रवाना झाले आहेत.

संतोष देशमुख यांचा खून आरोपी सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) व इतर पाच आरोपींनी अपहरण करुन खून केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात 637/2024 कलम 140 (1),126,118(1), 324(4) (5), 189 (2), 191(2), 190 भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या घटनेचे गांभिय लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस यांना योग्य त्या सुचना देऊन आरोपींचे शोध कामी तात्काळ पथके रवाना केली. या गुन्हयातील आरोपींचा वाशी, धाराशिव परीसरात शोध घेत जयराम माणिक चाटे (वय 21 रा.तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय 21 वर्षे रा. मैंदवाडी ता.धारुर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना विश्वासात घेऊन इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्हयात सहभागी प्रत्येकावर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार असुन नागरीकांनी अफवावर विश्वास ठेवु नये असे आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केले आहे.आता मनोज जरांगे पाटील हे मयत देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी मस्साजोगला रवाना झाले आहेत.