बीड

गोळीबार करणाऱ्या आठवले गँगच्या तिघांना पुण्यात अटक

By Balaji Margude

December 19, 2024

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

धनंजय जोगेडे/बीडदि.१९.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्या, गोळीबार अशा घटनांनी भीतीचं वातावरण आहे. बीड शहरात जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर घरात घुसून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गोळीबार करणाऱ्या आठवले गँगच्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात अटक केली.

अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, ओंकार सवाई असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत. ओंकारला बीडमधून तर अक्षय आठवले आणि मनीष क्षीरसागरला पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात मनीष क्षीरसागर आणि अक्षय आठवलेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपीला पुण्यातून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मुरकुटे, मुन्ना वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. आज या आरोपीना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.