धनंजय जोगडे बीड/दि.२१. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केल्याप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करणार असल्याचे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानुसार त्यांची बदली केली असून त्यांच्या जागी आता नवनीत कावत बीडचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत.मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पहिल्या दिवसांपासून उमटले. यात पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केल्याप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथील उप आयुक्त नवनीत कावत यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश गृह विभागाने आज काढले आहेत. कावत हे मूळचे राजस्थानचे आहेत.