बसने दोनशे फूट दुचाकी फरफटत नेलीगेवराई दि .22 : भरधाव एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 45 वर्षीय जिल्हा परिषद शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीसह शिक्षकाला बसने जवळपास दोनशे फूट फरफटत नेले होते. ही घटना गेवराई-शेवगाव रस्त्यावरील महारटाकळी येथे रविवारी (दि.22) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
फय्याज खान ( वय 45 रा.महारटाकळी ता.गेवराई) असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. फय्याज खान हे तालुक्यातीलच अर्धपिंपरी याठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. ते आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात होते. दरम्यान रविवारी क्रिकेट खेळून फय्याज खान हे सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घराकडे परतत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या माजलगाव-पुणे या बसने (एम.एच.13 सी.यू.7836) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात ऐवढा भिषण होता की, अपघातानंतर बसने दुचाकीसह फय्याज खान यांना जवळपास दोनशे फुट फरफटत नेले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात फय्याज खान या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चकलांबा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करुन फय्याज खान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चकलांबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला होता.