माजलगावच्या खानापूरमध्ये बापाने मुलाचा खून केल्याची घटना घडली.

बीड

माजलगावच्या खानापुरात बापाकडून लेकाचा खून

By Balaji Margude

May 04, 2025

गणेश मारगुडे । खानापूरदि.4 : माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबुचा पाय घालून खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.रोहीत गोपाळ कांबळे असे मयत तरूणाचे नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत मुलगा आणि आरोपी असलेला बाप या दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच कुरबुरी व्हायच्या. आठ दिवसांपुर्वीच रोहीत कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. आज सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कुरबूर झाली. यावेळी बापाने जवळच पडलेला लाकडी बांबू डोक्यात घालून त्याचा खून केला.घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलीस पोउपनि आकाश माकणे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. आरोपीला पोलीसांनी घटनास्थळाहून अटक केली आहे.

दारुची नशा करी जिवनाची दुर्दशागेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात दारूच्या कारणावरून सख्ख्या नात्यातील लोकांचा खून पाडण्याच्या जवळपास आठ घटना घडल्या आहेत. अंबाजोगाईच्या येल्डा येथे मुलाने आपल्या आईचा, तर परळीत पुतण्याने चुलतीच्या नरडीचा घोट घेतला होता. माजलगावात काही दिवसापुर्वी बाबासाहेब आगे यांची हत्या झाली होती ती देखील आरोपीने दारूच्या नशेतच केली होती. माजलगावातच एका ढाबा चालकाचा मर्डर करण्यात आला होता. तो देखील दारूच्या बीलावरूनच झालेला होता. आता खानापूर येथील ही घटना देखील दारूच्या नशेतच झाली आहे.

सहज उपलब्ध होतेय दारूबीड जिल्ह्यात इतर अवैध धंदे बंद असले तरी दारू मात्र प्रत्येक ढाब्यावर मिळू लागलेली आहे. इतकच नाही तर देशी दारूचे अड्डे देखील मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात आहेत. मात्र यावर कुठलीच कारवाई होत नाही. रोज माणसाचे मुडदे पडत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाचे अवैध दारूकडे असेच दुर्लक्ष राहील्यास लवकरच किराणा दुकानांमधून दारू विक्री होत असल्याचे दिवस पहायला मिळतील.