बीड

महाराष्ट्रातील ‘या’ वॉटरपार्कमध्ये मोठी दुर्घटना; एकाचा मृत्यू

By Balaji Margude

June 18, 2025

बीड, दि.18 : वॉटरपार्क म्हटले की बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावत नाही. आता प्रत्येक वॉटरपार्कमध्ये थीमपार्कही आले असून तिथे वेगवेगळी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही अनेक नावाजलेले वॉटरपार्क असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सयाजीराजे वॉटरपार्कचे नाव आवर्जून घ्यावे लागले. आता याच सयाजीराजे वॉटरपार्कमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून त्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

ही दुर्घटना सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्याच्या बाबत घडली आहे. येथील पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. धुमाळ हे भिगवण येथील नावाजलेले एलआयसी उद्योजक आहेत. दरम्यान, अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्क हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि वॉटर पार्क आहे. जिल्ह्यासह जवळील जिल्ह्यातून याठिकाणी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक येतात. जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचे हे वॉटर पार्क असून दुर्दैवाने आज येथील पाळण्याच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी, एकाच्या मानेला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. तर, पाळण्यातील तिसरा व्यक्ती किरकोळ जखमी आहे.