-साताबारावरील बोजा कमी करण्यासाठी स्विकारली अडीच हजार रुपयांची लाच
बीड दि.23 ः तक्रारदाराचा साताबारावरील बोजा कमी करण्यासाठी व दुसर्या खरेदी केलेल्या जमीनीची नोंद फेरफारला घेण्यासाठी तलाठ्याने तीन हजार रुपयांची लाच मागितली. तर खाजगी इसमाने लाच देण्यासाठी प्रोत्साहीत केले. बीड एसीबीने अडीच हजाराची लाच घेतांना दोघांनाही बुधवारी (दि.23) रंगेहाथ पकडले असून या प्रकरणी आष्टी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. (beed acb asthi trap)
अशोक रघुनाथ सुडके (वय 48 रा.कोरडगांव ता.पाथर्डी) असे लाचखोर ग्राममहसूल अधिकार्याचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील डोईठाण सज्जाचे ते काम पाहत होते. तर बापुराव रावसाहेब क्षीरसागर (वय 54 रा.डोईठाण ता.आष्टी) असे खाजगी इसमाचे नाव आहे. तक्रारदाराच्या जमीनीवरील बोजा सातबारावरुन कमी करण्यासाठी व दुसर्या खरेदी केलेल्या जमीनीचा फेरफारला नोंद करण्यासाठी प्रत्येक कामाचे 1500 रुपये असे एकूण तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. डोईठाण येथील कार्यालयातच 23 जुलै रोजी 2500 रुपये लाच रक्कम अशोक सुडके यांनी स्विकारली तर बापुराव क्षीरसागर यांनी ही लाच देण्यासाठी तक्रारदारास प्रोत्साहीत केले. या प्रकरणी दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे अटकेत आहेत. ही कारवाई लाचलुचतपच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अप्पर अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, निरीक्षक समाधान कवडे, सहायक उपनिरीक्षक सुरेश सांगळे, अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडूरंग काचगुंडे, अनिल शेळके, गणेश म्हेत्रे, अविनाश गवळी, अमोल खरसाडे, प्रदिप सुरवसे, अंबादास पुरी यांनी केली.

