बीड एलसीबी ॲक्शन मोडवर ; चंदनासह लाखोचा गुटखा जप्त!

बीड

बीड दि.24 : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात बीडची स्थानिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आलेली दिसत आहे. दोन दिवसापूर्वी वाळू तस्करीवर केलेल्या कारवाईनंतर, बुधवारी (दि.23) रात्री दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध चंदन लाकूड आणि प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यावर धाड टाकण्यात आली. दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संभाजीनगर व बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अटकेत आहेत.

पहिली कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, परळी रेल्वे पटरीच्या उत्तर बाजूस पालांमध्ये काही इसम चंदन लाकूड तासात आहेत. पथकाने तत्काळ छापा टाकला असता घटनास्थळी आरोपी फरार झाला. मात्र घटनास्थळावरून २१७ किलो चंदन लाकूड अंदाजे किंमत ८ लाख ६८ हजार जप्त करण्यात आले. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.न.१५५/२५, कलम ३०३(२), ३(५) बीएनएस अंतर्गत कारवाई करण्यात आली.

दुसरी कारवाईमध्ये गुप्त माहितीच्या आधारे उजनी पाटी (ता. परळी) येथे छापा टाकून प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. आरोपी बालाजी सौदागर फड (वय २५, रा. धर्मापुरी, ता. परळी) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी विविध कंपनीचा गुटखा व पानमसाला असा ५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यात एकूण १४ लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या या सलग कारवायांमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. चंदन तस्करी, प्रतिबंधित गुटखा विक्री, वाळू तस्करी अशा अवैध व्यवसायांवर एलसीबीने केलेल्या जोरदार धडक कारवायांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंमलदार रामचंद्र केकान, गोविंद भताने आणि सचिन आंधळे यांच्या पथकाने केली.

Tagged