बीड

अजितदादांच्या हस्ते बीडमध्ये होणार ध्वजारोहण!

By Keshav Kadam

August 11, 2025

बीड : भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन यावर्षी उत्साहात साजरा होणार असून, राज्य शासनाने विविध जिल्ह्यांतील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमांची जबाबदारी मंत्र्यांना दिली आहे. या यादीत बीड जिल्ह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला आली आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ११ ऑगस्ट रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार, यंदाचा मुख्य शासकीय कार्यक्रम मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते सकाळी ७.०५ वाजता होईल. तर, राज्यपाल राजभवन येथे ध्वजारोहण करतील. जिल्हास्तरावर मात्र मंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहेत. बीड जिल्ह्यातील शासकीय ध्वजारोहण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून, जिल्हा मुख्यालयावर सकाळी पारंपरिक मानमर्यादेत आणि शिस्तबद्ध वातावरणात हा कार्यक्रम होईल. यावेळी जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस दल, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शासकीय परिपत्रकात सर्व जिल्ह्यांसाठी प्रमुख पाहुण्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, बीड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहणासाठी अजित पवार उपस्थित राहणार असून, ते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विकासकामांवर, शासनाच्या योजनांवर आणि भविष्यातील प्रकल्पांवर भाष्य करतील, अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला सुरुवात केली असून, पोलीस विभागाकडून सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली जात आहे.