प्रतिनिधी/बीडदि.२६. गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कायदा व सुव्यवस्थेचा भंग झाल्याप्रकरणी प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी प्रा.हाके गेवराई शहरात येणार होते. त्यामुळे तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना प्रतिबंधक नोटीस बजावली होती. मात्र आदेशाकडे दुर्लक्ष करून ते आपल्या कार्यकर्त्यांसह गेवराईत दाखल झाले व छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबले. येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचवेळी निषेध करणारा गट चौकात जमला. पोलिसांनी प्रा.हाके यांना पुढे जाण्याची सूचना केली असता त्यांनी ती मानली नाही. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सुनील ढाकणे या कार्यकर्त्याने आपली चप्पल जमावाच्या दिशेने फेकली. त्यानंतर वातावरण तापले, घोषणाबाजी सुरू झाली व दोन्ही गट आमनेसामने आले. बळीराम खटके यांनी जमावाला चिथावणी दिल्याचे नमूद आहे. त्यामुळे आमदार समर्थकांनी दगडफेक व चप्पलफेक केली. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमाव पांगवला व प्रा.हाके यांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेनंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी बनून प्रा.लक्ष्मण हाके, सुनील ढाकणे, बजरंग सानप, बळीराम खटके, पवन कारवार, सिध्दू पघळ, मुक्ताराम आव्हाड, शिवाजी गवारे, दत्ता दाभाडे, अशोक बोरकर, वसीम फारुखी, शाहरुख पठाण, संतोष सुतार व मोईन ख्वाजा शेख अशा १४ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील कलम 189(2), 190, 191(2), 191(3), 285, 223 व 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

