दोघे गंभीर जखमी
बीड दि.३० : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ शनिवारी (दि.३०) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मयत व जखमी हे बीड तालुक्यातील पेंडगाव येथील मारुतीच्या दर्शनासाठी जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सहा जणांना चिरडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी व मयत हे पेंडगाव येथे दर्शनासाठी जात होते. मात्र मृत व जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारे कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.
