acb trap

अवैध वाळू वाहतूकीसाठी 20 हजार रुपये हप्ता घेताना पोलीस पकडला

बीड

बीड दि. 2 : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचे चित्र असतानाच त्यासाठी दरमहा हप्त्याची मागणी करणारा पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलिस अंमलदार सचिन अर्जुनराव तांदळे (वय ४५, रा. तुळजाई नगर, बीड) हा २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या कारवाईत रंगेहात पकडला.

मिळालेल्या माहितीनुसार, आलोसे तांदळे यांनी वाळू माफियाकडून अवैध वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दर महिन्याला २० हजार रुपये हप्ता म्हणून मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने १ सप्टेंबर रोजी लाच मागणीची तक्रार विभागाकडे दाखल केली. पडताळणीसाठी तक्रारदार व पंचासमवेत तांदळे यांच्याकडे गेले असता, तांदळे यांनी स्पष्टपणे प्रत्येक महिन्याकरिता २० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली व ती स्वीकारण्यास तयार असल्याचे कबूल केले. सोमवारी रात्री तक्रारदाराने २० हजार रुपयांची लाच देताच, पाटोदा पोलीस ठाण्यासमोरील आंबेडकर चौकात आलोसे तांदळे यांना पथकाने सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली. याप्रकरणी तांदळे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत शिंगारे, बीड उपविभागीय पोलिस अधिकारी सोपान चिट्टमपल्ली पल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान कवडे, सपोउपनि. सुरेश सांगळे, पोलिस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, गणेश म्हेत्रे, संतोष राठोड, अविनाश गवळी, प्रदीप सुरवसे, राजकुमार आघाव, सचिन काळे, विभीषण सांगळे व अंबादास पुरी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड) यांच्या पथकाने केली. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कुणीही शासकीय सेवक लाच मागत असल्यास त्वरित विभागाशी संपर्क साधावा.

हप्ते घेऊन वाळू सुरुच

दरम्यान, जिल्ह्यात अवैध वाळू बंद असल्याचे प्रशासन सांगत असले तरी, त्यासाठी हप्ते उकळले जात असल्याने अवैध वाळू वाहतूक सुरूच असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

Tagged