अंबाजोगाई: बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील रामराव नागरगोजे (वय ५७) यांनी अंबाजोगाई येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजता उघडकीस आली.
सुनील नागरगोजे हे मूळचे परळी तालुक्यातील नागदरा येथील होते. सध्या ते अंबाजोगाईतील प्रशांत नगर येथे भाड्याच्या घरात राहत होते. घरात कोणी नसताना त्यांनी छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.—

