बीड : जिल्हाभरात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती गंभीर बनली आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, बीड–परळीसह जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक पुलावरून पाणी वाहू लागल्याने जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
बीड–परळी महामार्गवर पाणी :-
परळी तालुक्यातील वंजारवाडी तळे पूर्ण क्षमतेने भरले असून, गुणवरा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने बीड–परळी महामार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, प्रवाशांचे हाल झाले आहेत.
आष्टी तालुक्यात सर्वाधिक फटका :–
आष्टी तालुक्यातही पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कडा गावातील 11, सोभा निमगावातील 14, घाटा पिंपरीतील 7, पिंपरखेडातील 6, धानोऱ्यातील 3 आणि डोंगरगण येथील 3 नागरिक पावसामुळे अडकले आहेत. एकूण सहा गावांतील 44 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या बचाव मोहिमेसाठी नगर जिल्ह्यातून लष्करी तुकडी मागविण्यात आली आहे. तसेच नाशिकवरून हेलिकॉप्टर मागविण्यात आले असून, अडकलेल्या नागरिकांना एअर लिफ्ट करण्याची तयारी सुरू आहे. पुण्याहून एनडीआरएफची टीम बीडकडे रवाना झाली आहे.
माजलगाव धरणातून 38 हजार
474 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग :-
माजलगाव तालुक्यात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. माजलगाव धरणाचे 10 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून 38 हजार 474 क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी, सिंदफणा आणि सरस्वती नदीसह परिसरातील ओढे-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहू लागले आहेत.
धारुर तालुक्यात वाहतूक बंद :-
धारूर तालुक्यातील अर्ध्याहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतूक बंद झाली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वडवणी तालुक्यातील
गावांचा संपर्क तुटला :-
वडवणी तालुक्यातीलही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बीड–वडवणी मार्गावरील सर्व रस्ते बंद झाले आहेत. उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पातील सोन्नखोटा सांडव्याची दोन वक्रद्वारे 75 सेंमी ने उघडण्यात आली असून, कुंडलिका नदीपात्रात तब्बल 4966 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाटोद्यात दासखेडा–पाचंग्री
महामार्गावरील वाहतूक बंद:-
पाटोदा तालुक्यात दासखेडा–पाचंग्री मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मांजरा धरणातून 6 हजार 988
क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू –
केज तालुक्यातील मांजरा धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरूच असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 6 वक्रद्वारे उघडण्यात आले आहेत. या वक्रद्वारांमधून 6988.55 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मांजरा नदीपात्रात पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान काल पासून पडणार पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस आणि ज्वारी यासारख्या खरीप पिकांवर पावसाचा तडाखा बसला असून, पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे हातचे पीक वाहून गेले आहे. अनेक ठिकाणी शेतीतील बांध तुटले असून, शेतमाल पाण्याखाली गेला आहे. जिल्हा प्रशासनाने बचाव व मदत कार्याला वेग दिला असून, पावसाने प्रभावित भागात पथकांना पाठविण्यात आले आहे. नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
