Asia Cup 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्व भारतीयांच्या भावनेचा आदर केला. सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं. मात्र टीम इंडियाने हस्तांदोलन करण्यास टाळल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेकडे निषेध नोंदवला आहे.

