बीड

घरकुलाच्या कागदपत्रासाठी लाच घेणारा ग्रामसेवक पकडला

By Keshav Kadam

September 19, 2025

बीड : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.

गंगाधर सुरेश ठोंबरे (वय 44), ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक), ग्रामपंचायत कार्यालय केकत सारणी, ता. केज, जि. बीड, रा. सारणी सांगवी, ह.मु. भगवानबाबा चौक, एम.आय.टी. रोड, अंबाजोगाई, जि. बीड, यांनी घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या बेबाकी प्रमाणपत्राच्या मोबदल्यात 5 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारदार यांनी लाच देण्याची इच्छा नसल्याने 18 सप्टेंबर 2025 रोजी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली. प्राथमिक पडताळणीत ठोंबरे यांनी 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीनंतर त्यांनी 4 हजार रुपये स्वीकारण्यास मान्यता दिली आणि पहिला हप्ता म्हणून 2 हजार रुपये घेण्याचे मान्य केले.

या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 18 सप्टेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यानंतर आज 19 सप्टेंबर 2025 रोजी तक्रारदाराकडून पंचासमक्ष 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती कार्यालय, केज परिसरात गंगाधर ठोंबरे यांना सापळा पथकाने रंगेहात पकडले.

लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली असून, ठोंबरे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केज पोलीस ठाण्यात सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीडच्या पथकाने कारवाई करत ग्रामसेवकाचा गैरप्रकार उघड केला.