अहिल्यानगर दि.17 : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री आणि राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले (वय ६६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
आज पहाटे तब्येत बिघडल्याने त्यांना तत्काळ अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी नगर-नेवासा आणि राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत विधानसभेचे सहा वेळा सदस्य म्हणून कार्य केले होते. राजकारणात त्यांचा मजबूत प्रभाव होता आणि सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.


