मनोज जरांगे पाटलांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
मला जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या धनजंय मुंडेना ताब्यात घ्या
केशव कदम – बीड दि.7 : अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी (दि.७) आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. या आरोपांनुसार, धनंजय मुंडे यांचे पीए कांचन यांनी काही व्यक्तींना घेऊन परळी येथे नेले असून, तिथे एका बैठकीदरम्यान आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. माहितीनुसार, या बैठकीत “जे लागेल ते देतो” अशा शब्दांत अडीच कोटी रुपयांपर्यंतची डील ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वीही ५ ते ६ कोटी खर्च झाल्याचा उल्लेख करण्यात आला. या सर्व गोष्टी धनंजय मुंडे यांच्या माहितीतून झाल्याचा आरोप करण्यात आला असून, आरोपींना संरक्षण मिळाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले जालना पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तींनी पुढेही धनंजय मुंडे यांच्याशी वारंवार भेट झाली. भाऊबीजच्या दिवशी पुन्हा कट रचल्याचे आणि बीड, गेवराईसह अनेक ठिकाणांतील व्यक्ती या प्रकरणात सहभागी असल्याचेही सांगण्यात आले. तसेच माझा अपघात घडविण्यासाठी गाडी देण्याच्या आणि परराज्यातील पाशिंग असलेल्या वाहनाच्या देवाणघेवाणीबाबतही चर्चा झाल्याचे म्हटले आहे. तसेच, गाडीत मोबाईल ठेवून जीपीएस बसविणे, फोटोमधून गुप्त कॅमेरे बसविणे आणि कामगार-बॉडीगार्ड यांना अधिक पगार देऊन ‘मॅनेजमेंट’ करण्यासारख्या गोष्टी केल्या गेल्याचे दावेही या पत्रकार परिषदेत करण्यात आले. तसेच, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुरेश धस, धनंजय देशमुख यांच्यासह राज्यातील अनेकांबद्दल आरोपींकडे पुरावे आणि रेकॉर्डिंग असल्याचा दावा करण्यात आला आहे. धनंजय मुंडे ब्लॅकमेलिंग करत असल्याचे, फोन कॉल्स आणि व्हॉट्सअॅप कॉल्सचे रेकॉर्डिंग आरोपींकडे असल्याचे सांगण्यात आले. माझ्याकडे काही पुरावे आहेत, परंतु तपासात अडथळा येऊ नये म्हणून सध्या ते सादर करणार नाही असेही जरांगे पाटील म्हणाले. मला जीवे मारण्यासाठी कट रचलेला आहे. त्याला चौकशीसाठी ताब्यात घ्या अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जरांगे पाटील यांनी केली आहे. मी सांगतोय ते आरोप नाहीत, मी जे घडले आहे ते सांगितले.