माजलगाव : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवशी प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करून अर्ज दाखल केले. यासोबतच अनेक अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल करत स्पर्धेची दिशा अधिकच रोचक बनवली.
माजलगाव शहरातील राजकीय हालचालींना आता वेग आला असून माजलगावमधील राजकीय तापमान चढू लागले आहे.भाजपकडून संध्या ज्ञानेश्वर मेंडके यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मेहेरीन बिलाल चाऊस या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने निरोनिसा खलील आतार पटेल यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आहे. शिवसेना (शिंदे गट) तर्फे राधा तुकाराम येवले यांनी ताकदीनिशी अर्ज दाखल केला. शिवसेना (उबाठा) गटाकडून सोनाली गोपाळ पैंजणे यांनीही उमेदवारी दाखल करत शिवसेनेतील दोन गटांमधील स्पर्धा अधिक तीव्र केली आहे. यासोबतच अपक्ष उमेदवार म्हणून मनिषा नितीन नाईकनवरे यांच्यासह इतर काही अपक्ष इच्छुकांनीही अर्ज दाखल केले आहेत. एकूणच, पाच प्रमुख पक्ष आणि अपक्ष उमेदवार अशा सर्व बाजूंनी लढवय्ये मैदानात उतरल्यानंतर नगराध्यक्षपदाची लढत बहुकोनी आणि चुरशीची बनली आहे.