बीड, : बीड नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एमआयएम या प्रमुख पक्षांमध्ये चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपाने अनपेक्षीतपणे नवखा उच्च विद्याभुषित डॉ. ज्योती घुमरे यांना मैदानात उतरवल्यानं या लढतींमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. जे मुजीब शेख तुतारीकडून उमेदवारी मागत होते त्या मुजीब शेख यांच्या सासू प्रेमलता दादाराव पारवे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आज उमेदवारी घोषित केली. एमआयएम पक्षाने तीन दिवसांपुर्वीच आपला उमेदवार घोषित केला होता. त्यांच्याकडून सुरेखा हर्ष श्रृंगारे यांचं नाव घोषित झालंय. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत शेवटपर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता ताणली गेली होती. दुपारी तीन वाजता फॉर्म स्विकारण्याची मुदत होती. पावणेतीन वाजता शरद पवारांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे आपल्या उमेदवारांचे ‘एबी’ फॉर्म आणि सोबत यादी घेऊन बीड नगर पालिकेत दाखल झाले. तेव्हा त्यांच्या पक्षाकडून माजी नगरसेवक विष्णू वाघमारे यांच्या पत्नी स्मिता विष्णू वाघमारे यांचं नाव पुढं करण्यात आल्याचं समजलं. तुतारी चिन्हासाठी अजिंक्या चांदणे यांच्या आई प्रेमलता चांदणे या इच्छूक होत्या. त्यांच्यात आणि वाघमारे यांच्यामध्ये तिकिटासाठी शेवटपर्यंत चुरस पहायला मिळाली.
या सगळ्या राड्यात एक मोठी गोष्ट घडली ती म्हणजे भाजपाने कुठेही चर्चा नसताना ऐनवेळी तगडा उमेदवार मैदानात उतरवलेला आहे. डॉ. ज्योती घुंमरे या बीडचे प्रसिध्द कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. घुमरे यांच्या पत्नी आहेत. त्या स्वतः भुलज्ज्ञ आहेत. मंत्री पंकजाताई मुंडे आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पहिल्याच झटक्यात आपला उमेदवार रेसमध्ये आणलाय.
तर घड्याळ चिन्हावर असलेल्या प्रेमलता दादाराव पारवे या पेशाने सरकार अधिकारी होत्या. नायब तहसीलदार पदावरून त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत, असे समजते. आजच्या स्थितीत भाजपाच्या उमेदवार घुमरे आणि घड्याळाच्या उमेदवार पारवे हे दोघेच प्रचंड रेसमध्ये आहेत. दुसरीकडे तुतारीची बीडमध्ये प्रचंड हवा होती. मात्र उमेदवारी जाहीर करायला त्यांनी केलेला उशीर, दोन सुशिक्षीत उमेदवारांमध्ये त्यांच्या उमेदवाराचं कमी पडणारे प्रोफाईल, यामुळे तुतारीला सर्व काही अनुकूल असतानाही आता मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचं दिसतंय.

