अंबाजोगाईत मोदी विरुद्ध मुंदडा ‘थेट लढत’

बीड

अंबाजोगाई दि.17 : अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आज वेग आला असून दोनही आघाड्यांच्या प्रमुख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी तर लोकविकास महाआघाडीच्यावतीने विद्यमान नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अर्ज दाखल केला आहे.


गेल्या तब्बल २५ वर्षांपासून अंबाजोगाई नगर परिषदेवर मोदी यांची सत्ता कायम आहे. शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता उपक्रम, विविध शहरी प्रकल्प यामधील त्यांच्या कार्यकाळाचा मोठा अनुभव लक्षात घेता महाआघाडीतील नेत्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. सतत सत्तेत राहिल्याने शहरातील विविध घटकांमध्ये त्यांची पकड मजबूत असल्याचे मानले जाते. दुसरीकडे, अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीने पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या नंदकिशोर मुंदडा यांना उमेदवारी देऊन नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण केली आहे. सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून अनेक जनहिताच्या प्रश्नांवर लढा देत आलेले मुंदडा हे प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळखले जातात. पहिल्याच प्रयत्नात नगराध्यक्ष पदासाठी सरळ मैदानात उतरत त्यांनी या निवडणुकीत रंगत आणली आहे. मोदी विरुद्ध मुंदडाअशी थेट लढत प्रथमच होत असल्याने केवळ अंबाजोगाईच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. दोन्ही उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. घोषणाबाजी, उत्साह आणि जयजयकारांनी शहराचे वातावरण निवडणूकमय झाले होते. आगामी काही दिवसांत प्रचाराला मोठी गति मिळणार असून दोन्ही आघाड्या आपापल्या ताकदीने रॅली, दौरे, प्रत्यक्ष जनसंपर्क सुरू करणार आहेत. शहरातील मूलभूत सुविधा, विकासाची गती, पारदर्शक प्रशासन आणि नवीन नेतृत्वाची अपेक्षा या मुद्द्यांवर ही निवडणूक अधिकच टोकदार होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अंबाजोगाई महानगराध्यक्षपदाची निवडणूक यंदा अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार असून ‘अनुभव की नवे नेतृत्व?’ या प्रश्नाचे उत्तर मतपेटी देणार आहे.

Tagged