परळी दि.29 : सध्या नगरपरिषद निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात आहे. तीन दिवसावर मतदान आलेले असताना परळीतील विद्यानगर परिसरात शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास गोळीबार झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. येथील अरुण टाक यांचा मुलगा राहुल टाक याने दारूच्या नशेत गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक चौकशीत आरोपीने दारूच्या नशेत असताना हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात राहुल टाक याच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस परळी शहर पोलीस करत आहेत.
एसपी नवनीत काँवत यांच्या गाडीचा अपघात
गोळीबाराच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत शुक्रवारी रात्री तातडीने घटनास्थळी गेले होते. परत बीडकडे निघाल्यानंतर पहाटे तीन ते सव्वा तीनच्या सुमारास केजजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. गाडी एका पोलवर धडकल्याने वाहनाचे काहीसे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील सर्वांनी सीट बेल्ट लावले असल्याने मोठा अनर्थ टळला.
