balraje pawar news

गेवराई : भाजप नेते बाळराजे पवार यांना अटक!

बीड

गेवराई (प्रतिनिधी) : माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात गेवराईतील भाजपचे नेते बाळराजे पवार यांना मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर गेवराई पोलिस ठाण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला पंडित गट आणि पवार गटाकडून एकमेकांवर केवळ गंभीर आरोप करण्यात येत होते. मात्र कोणतीही अधिकृत फिर्याद दाखल न झाल्यामुळे तत्काळ गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. त्यानंतर मतदानाच्या दिवशी गेवराई शहरातील प्रभाग क्रमांक १० येथे गोंधळ झाल्याच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पृथ्वी पंडित, राहुल उमाप, विजय सुतार, जीवन साळवे, प्रकाश साळवे, संकेत कांडेकर, ख्वाजा शेख, अमर शिंदे, विशाल भुंबे, जयसिंह पंडित, शिवराज पवार, बाळराजे पवार, विठ्ठल मोटे, मुन्ना मोटे, राहुल खंडागळे, विष्णू अतकरे, सय्यद एजाज मेंबर, कृष्णा पाटोळे, कैलास माने, प्रदीप सुतार, प्रदीप ननवरे (पाडळसिंगी) तसेच २० ते ३० अनोळखी इसमांचा समावेश आहे.

दरम्यान, जखमी अवस्थेत असलेले माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांचा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जबाब नोंदवला. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्यात आली होती. या तपासाच्या आधारे मंगळवारी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बाळराजे पवार यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन अटक केली. त्यांना आज दुपारी अडीच वाजता गेवराई येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tagged