kidnapping bride

बीड

गेवराईमध्ये दिवसाढवळ्या मुलीच्या अपहरणाचा थरार!

By Keshav Kadam

December 18, 2025

घटना सीसीटीव्हीत कैद, पोलीसांकडून शोध सुरु गेवराई दि.18 ः शहरातील कायदा-सुव्यवस्थेला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना गुरुवारी (दि.18) दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गेवराई पंचायत समिती जवळील चौकातून एका तरुणीला जबरदस्तीने उचलून कारमध्ये टाकत अपहरण केल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक प्रकाराची नोंद जवळील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित गाडीचा पाठलाग सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी ही कॉलेजमधून पंचायत समिती जवळील रस्त्याने शास्त्री चौकाच्या दिशेने पायी जात होती. याच वेळी अल्टो कारमधून आलेल्या दोन तरुणांनी अचानक तिच्या दिशेने धाव घेतली. तरुणीने जोरदार प्रतिकार करत आरडाओरडा केला. मात्र आरोपींनी तिला मारहाण करत जबरदस्तीने गाडीत ढकलले आणि घटनास्थळावरून भरधाव वेगात पळ काढला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. काहींनी गाडी अडवण्याचा प्रयत्नही केला, मात्र आरोपींनी गाडी न थांबवता शास्त्री चौकातून पुढे राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने शहागडकडे धाव घेतली. हा संपूर्ण थरार काही सेकंदांत घडला असून, त्याची दृश्ये सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तातडीने दखल घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, अपहरणासाठी वापरलेल्या अल्टो गाडीचा विविध दिशांनी शोध घेतला जात आहे. शहरात आणि आसपासच्या परिसरात नाकाबंदी करून पोलिसांचा जोरदार पाठलाग सुरू आहे. दरम्यान दिवसाढवळ्या अशा प्रकारे तरुणीचे अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.