आ.विजयसिंह पंडित : प्रेमलता पारवे यांनी
बीड नगराध्यक्ष म्हणून स्वीकारला पदभार
बीड, दि.2 : मी इतिहास-भूगोल पाहणार नाही, बीडकरांनी आपल्याला स्पष्ट कौल दिला आहे. आता राजकारणापेक्षा जनतेची कामे महत्त्वाची आहेत. प्रचारात दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, असे स्पष्ट निर्देश आमदार विजयसिंह पंडित यांनी दिले.
बीड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून प्रेमलता पारवे यांनी शुक्रवारी (दि. 2) पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, गटनेते फारुक पटेल, शिवसंग्रामचे अनिल घुमरे, स्वप्नील गलधर, सुहास पाटील, अशोक हिंगे, बी.बी. जाधव, शेख निजाम यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
आ. विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, बीड शहरात अनेक गंभीर प्रश्न आहेत. उन्हाळ्यापूर्वी नागरिकांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. थकबाकी वसुली, स्वच्छतेसाठी ठोस योजना राबवणे गरजेचे आहे. उणे-दुणे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. मुख्याधिकारी हे प्रशासकीय अधिकारी असून त्यांना चांगले काम करण्यासाठी पूर्ण पाठबळ दिले जाईल. मात्र कुणाचीही मानमानी चालणार नाही. प्रशासन ‘लाइन-दोरीत’ चालले पाहिजे. चुकीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
“अजितदादा हे कामाचे नेतृत्व आहे. दीड वर्षांत बीड नगरपरिषद बदलून दाखवायची आहे. बीडकर संयमी असून त्यांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. आता त्यांचे प्रश्न सोडवणे हेच आपले ध्येय असले पाहिजे,” असेही आ. पंडित यांनी स्पष्ट केले.
युती टिकवा, हवेत जाऊ
नका – अनिल जगताप
नगरसेवक अमर नाईकवाडे बोलताना म्हणाले की, 2029 मध्ये घड्याळाचा गजर झाला पाहिजे. त्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनीही आपल्या शैलीत उत्तर दिले. घड्याळाचाच गजर करायचा आहे तर मी धनुष्यबाण घेऊन कुठे जाऊ? बाणासोबत खान आणला आहे. जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आहे, नगरपरिषद जिंकली म्हणून हवेत जाऊ नका. पुढे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. दोन उपमुख्यमंत्री आपले आहेत, त्यामुळे जबाबदारीने काम करा. 2029 नंतर काय करायचे ते पाहू, पण अगोदर जनतेची कामे करा, असा सल्ला त्यांनी दिला. युती टिकवण्यासाठी सर्वांनी संयमाने काम करण्याचे आवाहन करत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
बीड नगरपरिषद ‘क्षीरसागर
मुक्त’ झालेच–अमर नाईकवाडे
अमर नाईकवाडे म्हणाले की, 2016 मध्ये 35 वर्षांची सत्ता उलथवून लावली होती. जनतेने प्रेम दिले, मात्र त्या काळात नेतृत्व फितूर ठरले. आज भैय्यासाहेब, आ.विजयसिंह पंडित यांचे सक्षम नेतृत्व मिळाले असून त्यामुळेच बीड नगरपरिषद क्षीरसागर मुक्त झाली आहे. 2029 मध्ये घड्याळाचा नगराध्यक्ष करण्याचा निर्धार सर्वांनी करावा, असे सांगत त्यांनी मागील काळातील मनमानीवर टीका केली.
शहरवासीयांचे प्रश्न प्राधान्याने
सोडवू –मुख्याधिकारी शैलेश फडसे
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. आता पदाधिकारी कार्यरत झाल्याने प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. गतिमान प्रशासन देत सर्व अडचणी प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

