– बीड उपअधीक्षक पूजा पवार यांची कारवाई ; २० लाखाचा मुद्देमाल जप्त
बीड दि.4 : तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील सिंदफना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून तिची चोरटी करणारा टेम्पो पकडला. यात तब्बल २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाल्मीक बाबासाहेब पतंगे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधीक्षक पूजा पवार यांनी रविवारी (दि.4) सकाळी केली.
पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक माधव काटकर, अंमलदार सचिन आगलावे यांनी गुंदा गाव ते ईट फाटा रोड दरम्यान सापळा रचून अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो (एमएच.२३.एयू.४८७१) पोलिसांनी पकडला. त्यात अंदाजे दोन ब्रास वाळू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या टेम्पोची अंदाजे किंमत २० लाख रुपये, तर वाळूची किंमत १० हजार रुपये अशी एकूण २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अशा अवैध प्रकारांविरोधात आमच्या कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहतील अशी प्रतिक्रिया उपअधीक्षक पूजा पवार यांनी दिली.

