बीड

मोठा घोटाळा! तपासणी न करताच ३२० वाहनांना दिले फिटनेस प्रमाणपत्र

By Keshav Kadam

January 09, 2026

परराज्यातील पाच एजंटवर गुन्हा दाखल झाल्यामुळे बीडमधील एजंटामध्ये खळबळ

बीड आरटीओच्या सतर्कतेमुळे कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस

केशव कदम | बीड, दि. ९ : योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) नुतनीकरणाच्या कामकाजात परराज्यातील स्वयंचलित वाहन तपासणी (ATS) केंद्रांमार्फत मोठ्या प्रमाणावर बनावट व बोगस पद्धतीने वाहनांना फिटनेस प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सतर्क तपासणीत हा कोट्यवधींचा घोटाळा समोर आला असून याप्रकरणी परराज्यातील पाच एजंटावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची संख्या आणखी वाढणार असून या घटनेने बीड जिल्ह्यातील एजंट, वाहनधारक यांच्यामध्येही खळबळ उडाली आहे.

दैनंदिन वाहन तपासणीदरम्यान असे निदर्शनास आले की, बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंद असलेल्या अनेक वाहनांना केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम ५६ व केंद्रीय मोटार वाहन नियम ६२ चे उल्लंघन करून, कायद्याने विहित केलेली कार्यपद्धती न वापरता, प्रत्यक्ष वाहन तपासणी न करता फिटनेस प्रमाणपत्रांचे नुतनीकरण करण्यात आले आहे.उलट तपासणीतून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात नोंद असलेल्या एकूण सुमारे ३२० वाहनांना राजस्थान, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात तसेच इतर राज्यांतील खाजगी स्वयंचलित वाहन तपासणी (ATS) केंद्रांमधून प्रत्यक्ष तपासणी न करताच योग्यता प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. ही बनावट पद्धत अद्यापही एजंटमार्फत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सदर वाहने प्रत्यक्षात संबंधित ATS केंद्रावर न नेता, केवळ वाहनांचे फोटो अपलोड करून, मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा भंग करत फिटनेस प्रमाणपत्रे देण्यात आली. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. तसेच मा. उच्च न्यायालयाने २८/२०१३ मधील जनहित याचिकेत आदेशित केलेल्या कार्यपद्धतीचेही उल्लंघन आहे.

बोगस फिटनेस प्रमाणपत्र देण्याची एजंटांची पद्धती फिटनेसची मुदत संपलेल्या वाहनांचे चारही बाजूंचे फोटो, ऑडोमीटर व चेसिस क्रमांकाचे फोटो एजंटमार्फत घेतले जातात. प्रत्येक राज्यात नियुक्त एजंट हे संबंधित ATS केंद्रातील एजंट किंवा मालक व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतात. वाहनमालकांकडून अंदाजे १० ते २० हजार रुपये घेऊन “एक ते चार दिवसांत फिटनेस ऑनलाइन अपडेट होईल” असे आश्वासन दिले जाते. त्यानंतर हे फोटो रॅकेटमधील पुढील एजंट किंवा थेट ATS केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे पाठवले जातात. प्रत्यक्ष वाहन तपासणी न करता शासनाच्या अधिकृत ‘वाहन ४.०’ प्रणालीवर फिटनेस प्रमाणपत्र अद्ययावत केले जाते.

दोन महिन्यांचे स्टिंग ऑपरेशन

हा स्कॅम उघडकीस आणण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांनी मागील दोन महिन्यांपासून अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, बीडचे परिवहन अधिकारी बालाजी धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईसाठी त्यांना बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील राहुल माने, अतुल गावडे, शशिकांत जाधव, पवन गायके व प्रवीण काकडे यांनी सहकार्य केले.

पाच एजंटवर गुन्हा दाखल

मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्या फिर्यादीवरून साकिब रजा, हाजी फारुक हाजी अब्दुल सत्तार मन्सूरी, कपिल मौर्या, अपु नोवेल व अन्य एक अशा परराज्यातील पाच एजंटवर मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज करत आहेत.