Site icon कार्यारंभ लाईव्ह

सहकार अधिकारी 25 हजाराची लाच घेताना पकडला!

आठवड्यात जालना एसीबीची बीड जिल्ह्यात दुसरी कारवाई

बीड दि.2 : सध्या जालना एसीबी बीड जिल्ह्यात कारवाईचा धडका लावला आहे. आठवड्यात जालना एसीबीने माजलगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यासह एका खाजगी इसमावर कारवाई केल्यानंतर सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. अंबाजोगाई येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी (वर्ग-३) संतोष भंडारी यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी (दि.2) रंगेहात पकडण्यात आले.

तक्रारदार हे एका पतसंस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात निबंधक कार्यालयात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीत मदत करण्यासाठी आणि अहवाल अनुकूल देण्यासाठी संतोष भंडारी यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. शेवटी २५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याऐवजी तक्रारदाराने भ्रष्टाचाराचा हा बुरखा फाडण्याचे ठरवले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जालना एसीबीचे उपअधीक्षक जाधवर आणि त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने २५ हजार रुपये भंडारी यांना देताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी भंडारी याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

Exit mobile version