बीड: राज्यात आज सकाळपासूनच धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत असताना, बीड आणि इचलकरंजी शहरांतून दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बीडमध्ये एका भीषण कार अपघातात तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे, तर इचलकरंजीत धुळवड दिली नाही म्हणून एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
बीड: वॉटर पार्कला जाताना काळाचा घाला
बीड ते शिरूर रोडवर रायमोहा गावाजवळ मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला. कृष्णा मुळे असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या मित्रांसोबत धुळवड साजरी करण्यासाठी वॉटर पार्कला जात होता.
कसा झाला अपघात? मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा आणि त्याचे मित्र व्हेरा आणि थार अशा दोन कारमधून प्रवास करत होते. नागऱ्याचीवाडी परिसरात आले असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. वेग जास्त असल्याने कार रस्त्याच्या कडेला चारवेळा पलटी झाली आणि थेट विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. या भीषण धडकेत कृष्णा मुळे याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने, मागून येणाऱ्या दुसऱ्या कारमधील मित्रांनी तातडीने जखमींना बीडमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे बीड शहरात शोककळा पसरली आहे.
