beed police

बीड

सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणातीलआरोपी प्रदीप फाटेला पुण्यामधून अटक

By DHANANJAY JOGDE

March 03, 2026

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

धनंजय जोगडे / बीड : बीडमधील वस्तू व सेवाकर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेला वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पुणे येथून अटक केली.

सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांच्या जबाबानंतर २३ जानेवारी रोजी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात प्रदीप फाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा नोंदवल्यानंतर तो फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अखेर मंगळवारी ४० दिवसांनंतर पुणे येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान मयुरी जाधवर यांनी दिलेल्या जबाबात, फाटे हे अतिरिक्त पदभाराच्या जोरावर सतत मानसिक छळ करत होते, कार्यालयात अपमानास्पद वर्तन करत होते तसेच काही विशिष्ट फर्मची बेकायदेशीर कामे करण्यासाठी दबाव टाकत होते, असा आरोप करण्यात आला आहे. १६ जानेवारी रोजी सचिन जाधवर बेपत्ता झाले होते, तर १७ जानेवारीला कपिलधारवाडी परिसरात त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळून आला होता.