लाचखोर चकलांबा ठाणेदार अन् कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
बीड दि.10 : अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी पर डे म्हणजे दिवसाला हप्ता घेणारा चकलांबा पोलीस ठाण्याचा प्रभारी संदीप पाटील आणि कर्मचारी विनोद सुरवसे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. दरमहा ६० हजार रुपयांची लाच लाच स्वीकारताना प्रकरणी बीड एसीबीने मंगळवारी (दि.10) रात्री 10 वाजता रंगेहाथ पकडले. या कारवाईने बीड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Beed acb news)
वाळूचे वाहन बिनदिक्कत चालू देण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ६० हजारांची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. हे पैसे घेण्यासाठी कर्मचारी विनोद सुरवसे उमापूर पोलीस चौकीत उपस्थित होता. एसीबीच्या पथकाने सापळा रचून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरवसेला ताब्यात घेतले. (कार्यारंभ) ही कारवाई बीड एसीबीचे पोलीस उप अधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने केली. दरम्यान पाटील आणि सुरवसे या दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. वाळू माफियांना साथ देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याने खळबळ उडाली आहे.

