बीड-अहिल्यानगर महामार्गावर कापशीजवळ हायवाची समोरासमोर धडक
बीड दि.27 : बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर कापशी गावाजवळ शुक्रवारी सकाळी सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन कार जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात कारमधील पती-पत्नीचा होरपळून जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील एक दाम्पत्य आपल्या कारमधून बीडकडे प्रवास करत होते. याचवेळी बीडकडून डोईठाणच्या दिशेने खडी घेऊन जाणाऱ्या भरधाव हायवाने कापशीजवळ त्यांच्या कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाने तात्काळ पेट घेतला. अपघातानंतर काही क्षणातच कारने आगीचे रौद्र रूप धारण केले. अचानक लागलेल्या आगीमुळे कारमधील पती-पत्नीला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि दोघांचाही कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

