बीड, दि.31 : बीड जिल्ह्यात लाचखोरी काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. सिरसाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल दत्ता नागनाथ निघुल याला दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा उसाने भरलेला ट्रॅक्टर काही शेतकऱ्यांनी शेतातून बाहेर जाऊ दिला नव्हता. याबाबत तक्रारदाराने सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर कॉन्स्टेबल दत्ता निघुल याने ट्रॅक्टर बाहेर काढून देण्यासाठी मदत केली. मात्र, ही मदत केल्यानंतर “चहापाणी”च्या नावाखाली दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार दत्ता निघुल याला सिरसाळा येथील मुख्यालयातून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रदीप सुरवसे, बिडकर, काळे तसेच चालक म्हेत्रे यांनी केली. दरम्यान, या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
