बीड दि. 8 : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये साधे काम करून घेण्यासाठीही अधिकारी, कर्मचारी लाचेचा मार्ग स्वीकारत असल्याची वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. अधिकारी सहजासहजी कामाला हात न लावता प्रत्येक ठिकाणी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारींना आज ठोस पुष्टी मिळाली. एकाच दिवशी तलाठी आणि ग्रामसेवक यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
वारसा हक्क प्रमाणपत्र काढण्यासाठी ३९ हजारांची मागणी करून तडजोडीअंती ३५ हजारांवर सौदा ठरल्यानंतर त्यातील ९ हजार रुपये घेताना दहिफळ वडमाऊली येथील तलाठी परमेश्वर जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. तलाठी कार्यालयाबाहेरच हा सापळा रचण्यात आला होता. ही कारवाई डीवायएसपी सोपान चिटमपल्ले, बीडकर, सुरवसे, पुरी यांच्या पथकाने केली. तसेच दुसरी कारवाई परळी तालुक्यातील पिंपळगाव गाडे येथील अतिरिक्त पदभार असलेल्या ग्रामसेवक दशरथ देविदास गोरे याच्यावर करण्यात आली. जलसिंचन विहिरीसाठी १ हजारांची मागणी करून त्यातील ५०० रुपये स्वीकारताना त्याला एसीबीने ताब्यात घेतले. ही कारवाई समाधान कवडे, शेळके, गवळी, काळे, मेहत्रे यांच्या पथकाने पार पाडली. एकाच दिवशी दोन कारवाया झाल्याने लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

