SHARD PAWAR AND AJIT PAWAR

बीड

बारामतीची सांगता सभा गाजली; शरद पवारांकडून हॉस्पिटलमधूनच सुनेत्रा पवारांना…

By Karyarambh Team

April 22, 2026

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज एका अत्यंत भावूक वातावरणात झाली. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ आयोजित सांगता सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी नेत्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार प्रत्यक्ष सभेत उपस्थित राहू शकले नाहीत, तरीही त्यांनी योग्य वेळ साधत सोशल मीडियाद्वारे बारामतीकरांशी संवाद साधला आणि सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी आपले पाठबळ जाहीर केले.

शरद पवार सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून, डॉक्टरांनी त्यांना प्रवासासाठी मनाई केल्याने ते प्रथमच मतदानाला मुकणार आहेत. याबद्दल खेद व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, १९६७ पासून त्यांनी एकदाही मतदानाचा हक्क चुकवलेला नाही, मात्र यंदाच्या दुर्दैवी परिस्थितीत त्यांना मुंबईतच राहावे लागत आहे. आपल्या पत्राद्वारे त्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला असून, हीच खऱ्या अर्थाने अजित पवार यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल. निवडणूक आयोगाचे इतर पर्याय उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष मतदानाला येता येत नसल्याचे सांगत, त्यांनी बारामतीकरांना सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे भावनिक आवाहन केले आहे.