माजलगावात अवैध गांजा शेतीचा पर्दाफाश

बीड

माजलगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई ; 14 लाखाचा मुद्देमाल जप्त

माजलगाव : तालुक्यातील निपाणी टाकळी परिसरात अवैध गांजा शेतीचा पर्दाफाश करत माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारी मोठी कारवाई केली. गट क्रमांक 143/144 मधील शेतात लपवून ठेवलेला 55 किलोपर्यंतची गांजाची झाडे या कारवाईत जप्त करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माजलगाव ग्रामीण पोलिसांना निपाणी टाकळी शिवारातील शेतात गांजाची शेती सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून शनिवार (दि.२४) दुपारच्या सुमारास छापा टाकला. यावेळी शेतभर पसरलेली मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली. तपासात एकूण 55 किलोपर्यंतची गांजाची झाडे ज्याची एकूण किंमत 13 लाख 91 हजार 975 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी पांडुरंग भोपा राठोड (रा. वसंतनगर तांडा) यांच्याविरुद कलम 8 (C), 20 (A) गुंगीकारक द्रव्य आणी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 नुसार ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस देविदास सोनवळे, पोउपनि.संदीप राठोड, पोकॉ.जेथेवाड, मपोकॉ.मस्के, गोविंद बाबरे, अडागळे, चव्हाण यांनी केली. दरम्यान ग्रामीण भागात अवैध गांजा शेती वाढत असल्याचे संकेत या कारवाईमुळे पुन्हा स्पष्ट झाले आहेत.

Tagged