बीड दि.29 : केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या या पदासाठी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा प्रयत्न होता. मात्र, गावकर्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप करत स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणुकीदरम्यान स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला, तर मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या नावावर मतांची मागणी केली. अखेर गावकर्यांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल दिला. त्यांनी तब्बल 92 मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा संतोष देशमुख यांनी अवघ्या 9 मतांनी पराभव केला होता. मात्र, यावेळी परिस्थिती बदलली असून त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीविरुद्ध निवडणूक लढवत 92 मतांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. या निकालामुळे मस्साजोग ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे मानले जात आहे.


