बीड : भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणातील आरोपी तथा बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना २९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात १५४ लवाद आदेशांद्वारे तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव मावेजा मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी भूसंपादन सतीश धुमाळ यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार महसूल विभागातील अधिकारी, कंत्राटी कर्मचारी आणि काही वकिलांसह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासादरम्यान तांत्रिक पुरावे, कागदपत्रे आणि संगणकीय नोंदींमधून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा सहभाग समोर आल्याचा दावा एसआयटीने केला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री लातूर येथून त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. पुढील तपासासाठी न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.या काळात एसआयटीने घोटाळ्यातील संचिका, लॅपटॉप, संगणक तसेच मोबाईल रेकॉर्डिंगची तपासणी केली. पाठक यांच्या आवाजाचे नमुनेही तपासासाठी घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्या.एस.आर.शिंदे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पाठक यांना २९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर करत कारागृहात रवानगी केली. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू असून घोटाळ्यात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.