Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड एसीबीने लाचखोर पकडला!

केशव कदम : बीड

दि. १८ : बीड जिल्ह्यात लाचखोरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सौर पंपासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई आज करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बीड एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा अश्रूबा पाळवदे (वय ३३) हे तेलगाव उपकेंद्र येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांचे सौर पंप योजनेसाठी नाव मंजूर झाले होते. त्यासाठी स्थळ पाहणी करून ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात आरोपीने एक हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने चिंचाळा येथे सापळा रचला. यावेळी आरोपी कृष्णा पाळवदे हे तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, अंमलदार पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, अविनाश दळवी तसेच चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास सुरु आहे.

Exit mobile version