केशव कदम –
बीड दि. 6 : बीड जिल्ह्यातील लाचखोरी दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील नेकनुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंमलदार बळवंत यास 10 हजारांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. 6) दुपारी नेकनुर पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणातील काम करण्यासाठी संबंधित अंमलदाराने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नेकनुर पोलीस ठाण्याच्या परिसरात कारवाई करत अंमलदार बळवंत यास 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेला हा कर्मचारी यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. काही महिन्यांपूर्वी शेतीच्या कारणावरून झालेल्या वादात संबंधित अंमलदार एका व्यक्तीस “कॅरेक्टर खराब करून टाकीन” अशी धमकी देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतरही त्याच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता लाच स्वीकारताना झालेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा नेकनुर पोलीस ठाणे चर्चेत आले आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्यासह अंमलदार मच्छिंद्र बीडकर, प्रदिप सुरवसे, अमोल खरसाडे, चालक अंबादास पुरी यांनी केली. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


