केशव कदम
बीड दि. ६ : पकडला तो चोर असंच काही सचित्र सध्या लाचखोरांच्या बाबतीत घडत आहे. स्वतः खूप कारवाई करत असल्याचा आव आणणारे अंबडचे तहसीलदार मोठे लाचखोर निघाले. मात्र पापाचा घडा एक ना एक दिवस भरतो, त्याचप्रमाणे अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठ्या कारवाईत ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. शनिवारी (दि. ६) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने महसूल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलंड मशीनवर कारवाई न करण्यासाठी तसेच सहा हायवा वाहने सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी संबंधित तक्रारदाराकडे तब्बल ७ लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी निष्पन्न झाली. त्यानंतर झालेल्या तडजोडीनुसार ६ लाख ४० हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून तहसीलदार विजय चव्हाण यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. एसीबीच्या या धडक कारवाईची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे