बीड दि.7 : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केलेले अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी झडती घेण्यात आली. या झडतीत 1 लाख 8 हजार 800 रुपयांची रोख रक्कम, 8.8 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 80 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. https://karyarambhlive.com/news/13417/?
गोदापात्रातील अवैध वाळू उपसा करणार्या पोकलंड मशीनवर कारवाई न करण्यासाठी तसेच सहा हायवा वाहने सुरु ठेवण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे तब्बल 7 लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या तडजोडीनुसार 6 लाख 40 हजार रुपयांची लाच छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घराच्या परिसरात स्वीकारताना बीड एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची पडताळणी आणि घरझडतीची प्रक्रिया राबविण्यात आली. या झडतीदरम्यान रोख रक्कम तसेच मौल्यवान दागिने आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू असून जप्त करण्यात आलेल्या साहित्याबाबतही चौकशी केली जात आहे. एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.