Site icon कार्यारंभ लाईव्ह

ज्ञानराधा मल्टीस्टेटचे शाखाधिकारी गजानन घोडकेंना अटकपूर्व जामीन!

court

court

केशव कदम – बीड

दि.१३ : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या बीड येथील शिवाजीनगर शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी गजानन नारायण घोडके यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेटचे महाराष्ट्रासह राज्याबाहेरही विस्तृत जाळे पसरले होते. आकर्षक व्याजदरांचे आमिष दाखवून लाखो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे तसेच इतर पदाधिकाऱ्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणात सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि शिवाजीनगर शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी गजानन नारायण घोडके यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात गजानन घोडके यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालय, बीड यांनी यापूर्वी फेटाळून लावला होता. त्यानंतर ॲड. सुदर्शन साळुंके यांच्या मार्फत घोडके यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जुलै २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.या प्रकरणात गजानन घोडके यांच्यावतीने ॲड. सुदर्शन साळुंके यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲड. मुकेश गोयंका यांनी बाजू मांडली.

Exit mobile version