beed nagar palika

बीड

बीड नगरपरिषदेचे सीओ शैलेश फडसे यांची बदली!

By Keshav Kadam

June 17, 2026

नांदेड येथे सहायक आयुक्तपदी नियुक्ती

बीड : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली केली आहे. याबाबतचा शासन आदेश १७ जून २०२६ रोजी जारी करण्यात आला असून फडसे यांची नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील गट-अ संवर्गातील सहायक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.शासन आदेशानुसार महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

सध्या बीड नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले शैलेश फडसे यांना त्यांच्या विद्यमान पदावरून कार्यमुक्त करण्यात येणार असून नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.आदेशात नमूद केल्याप्रमाणे, फडसे यांनी १७ जून २०२६ च्या पूर्वान्हापासून आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार सोडायचा असून १८ जून २०२६ रोजी नांदेड येथे नव्या पदावर रुजू व्हायचे आहे. तसेच पदभार स्वीकारल्यानंतर त्याचा अनुपालन अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.दरम्यान, बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर आता कोणाची नियुक्ती होणार याकडे शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बीड नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.