परभणी: जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे. मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराचा (Hanuman Temple) सभामंडप अचानक कोसळल्याची दुर्दैवी घटना आज शनिवार (२० जून २०२६) रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात ढिगाऱ्याखाली जवळपास ३० ते ४० भाविक दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
यशवाडी येथील हनुमान मंदिर हे अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान मानले जाते. केवळ परभणीच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरातून हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आज शनिवारचा दिवस असल्याने मंदिरात दर्शनासाठी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या या सभामंडपाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर होते. दुपारच्या सुमारास अचानक हा नव्याने बांधण्यात येत असलेला संपूर्ण सभामंडप कोसळला. मंडप कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ निर्माण झाली. या दुर्घटनेच्या वेळी दर्शनासाठी मंडपात उपस्थित असलेले ३० ते ४० भाविक मलब्याखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
प्रशासन घटनास्थळी दाखल; स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी आणि स्थानिक यंत्रणा तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. मलब्याखाली अडकलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका पाचारण करण्यात आल्या असून, वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली आहेत. ढिगारा उपसण्यासाठी क्रेन व इतर यंत्रसामग्री मागवण्यात आली आहे.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार राजेश विटेकर यांच्याकडून प्रशासनाला सूचना या भीषण दुर्घटनेनंतर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर तात्काळ हालचाली सुरू झाल्या आहेत. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतली असून त्या स्वतः परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी तात्काळ संपर्क साधून सर्व आवश्यक मदत यंत्रणा, वैद्यकीय पथके आणि क्रेन घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनीही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बचावकार्याला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व भाविकांना सुरक्षित बाहेर काढणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असून, संपूर्ण जिल्हा यंत्रणा मानवतकडे रवाना झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यावर मोठी शोककळा पसरली आहे.